Saturday, March 25, 2017

अविस्मरणीय के२एस

कात्रज ते सिंहगड, कात्रज ते सिंहगड लई ऐकलं होतं कॉलेजला असताना.. पण नक्की काय असतं कधी कळलंच नाही..१०-१२ डोंगर चढून उतरून जावं लागतं इतकंच काय ते माहित होतं..

वर्ष दीड वर्षांपूर्वी किल्लेदारीचा सभासद झालो..ट्रेकिंग वगैरे फार कधी केलंच नव्हतं.. पण आता संतोष भाऊंनीच ग्रुप काढला म्हटल्यावर सभासद तर झालो..ट्रेकला जायचं की नाही पुढची गोष्ट होती..ग्रुप पण लई बेकार आहे हा..नुसतं सभासद असून चालत नाही..ग्रुपबरोबर नाही तर स्वतःने अधून मधून ट्रेक करत रहावं लागतंय..नाहीतर ग्रुपमधून काढून टाकतात.. एक दोन छोटे मोठे ट्रेक केले होते मी..पण कात्रज ते सिंहगड म्हणजे शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहणारा ट्रेक असणार याची जाणीव होती..ऐन वेळेस स्टॅमिना कमी पडला तर अर्ध्यातून ट्रेक सोडायला लागू नये अशी माझी माफक अपेक्षा स्वतःकडून होती..

गेल्या आठवड्यात ट्रेक डिक्लेअर झाला..आधी संतोषदादाला मेसेज केला..म्हटलं, 

"मला जमलं का रे?" 

त्याचा रिप्लाय आला,

 "१४-१५ डोंगर चढून उतरावे लागतात.टोटल डिस्टन्स १६-१७ किमी होतं. भलेभले थकून जातात. तुला यायचं असलं तर निदान राहिलेल्या २-३ दिवसात सकाळी २-३ किमी चालायची प्रॅक्टिस कर.बरं एवढं करूनही त्रास होणार नाही असं नाही."

मी म्हटलं,"तू एनकरेज करतोय की भीती घालतोय."

"तू चल. बाकीचं बघू तेव्हाचं तेव्हा."

शुक्रवारी संध्याकाळी ट्रेकला येणारे सात जण कात्रजला भेटलो.तिथून एक व्हॅन पकडून कात्रजच्या बोगद्याला उतरलो.तिथून चढायला सुरुवात केली. पहिल्याच डोंगराला वाट चुकली. रानातून वाट काढत काढत चढाई सुरु होती. वर चढताना मोकळी झालेली माती परीक्षा पहात होती.एका ठिकाणी जरा विश्रांतीला थांबलो तर डोंगरावरुन दोन मोठी साळिंदर आमच्या दिशेने पळत येताना दिसली. आम्हाला घाबरून म्हणा किंवा अजून काही म्हणा त्यांनी आपला मार्ग बदलला आणि दुसऱ्या वाटेने निघून गेली. एव्हाना पहिला डोंगर चढून माथ्यावर आलो होतो. वारं लागत होतं त्यामुळे जरा बरं वाटत होतं. मनातल्या मनात स्वतःला सांगितलं, "आता माघार नाही." आणि पुढची पायपीट सुरु केली.

सातव्या डोंगरपर्यंत थोडं वेगात, थोडं थांबून गेलो. एव्हाना दहा वाजले होते. सर्वानुमते जेवण करायचं ठरलं. आपापले डबे काढून सहलीला आलोय जणू असे सगळे जेवायला बसलो. प्रदीपच्या डब्यात पुऱ्या आणि बटाट्याची भाजी होती. त्यावरून शाळेतल्या सहलीला कशा सगळ्या आया आपल्या पोरांना हाच मेनू द्यायच्या यावर चर्चा होऊन मनसोक्त हसलो. तोंडी लावायला संजूदा आणि संतुदाचे इकडच्या तिकडच्या ट्रेकचे किस्से होतेच. जेवण करून पुन्हा चढाईला सुरुवात झाली. पोटात भर पडल्याने बरं सुद्धा वाटत होतं पण चढायला आधीसारखा हुरूप नव्हता. आता दोन जोडप्यांबरोबर चालण्यापेक्षा मी प्रदीप आणि कौस्तुभ बरोबर चालू लागलो. याचा फायदा असा होत होता की चढण वेगात होई. माथ्यावर जाऊन मागचे लोक येईपर्यंत पुरेशी विश्रांती होत असे. त्यामुळे एनर्जी कायम राहत असे. वाटेत जाताना प्रदीप वन्यजीवांबद्दल त्यांच्याकडची माहिती पुरवत होता. 

आत्तापर्यंत एक गोष्ट लक्षात आली होती. डोंगर चढताना जोर लावून वेगात चढायला त्रास होत नव्हता. पण उतरताना मात्र अतिशय काळजीपूर्वक उतरावं लागत होतं. जरा कुठे चूक झाली तर पार्श्वभागाची काही धडगत नव्हती. १० डोंगर झाले आणि सगळ्यांना जरा बरं वाटलं. संतुदा अजून काही बोलत नव्हता. त्यावरून लक्षात आलं पुढे अजून अवघड चढण असणार. अपेक्षेप्रमाणे ११ व्या डोंगराने सगळ्यांचा घामटा काढला. संजूदा प्रचंड थकले होते.इथंच तंबू ठोकू म्हटलं तर म्हणतात,

"आख्खी रात्र चाललं मी, पण इथे इच्चू काट्यांत झोपणार नाही."

पुन्हा पायपीट सुरु झाली. मी थोडा वेळ संजूदा बरोबर चाललो. त्यांचा मूड थोडा चिअर अप करायला त्यांना म्हटलं,

"आपल्या अध्यक्ष महोदयला हा ट्रेक करायला लावला पाहिजे नाही का?"

संजूदा हसत म्हणतात,"अरे तो कसला येतो.आला तर चॉपर घेऊन येईल इथं."

इतका वेळ फारसं बोलत नसलेले पाय आता बोलू लागले होते. थकवा जाणवू लागला होता. पण हा ट्रेक असा आहे की अर्ध्यातून सोडून देता येत नाही. कारण पुढे मागे जायला काहीच ऑप्शन नसतो. मागे फिरलं तरी तेवढीच पायपीट परत करावी लागते. त्यापेक्षा हळूहळू का होईना पुढे जात राहिलेलं परवडतं. संतुदाने आधीच सांगितलं होतं प्रत्येकाने किमान चार लिटर पाणी बरोबर ठेवा. त्याने तसं का सांगितलं याचा प्रत्यय चालताना येत होता. या सबंध पायपिटीमध्ये कुठेही पाण्याचा मागमूसही दिसला नाही. घोट घोट करून प्यायलेलं पाणी एव्हाना संपत आलं होतं. अजून बरंच अंतर कापायचं बाकी होतं. ट्रेक पूर्ण झाल्यावर प्यायला थोडं तरी पाणी हवं म्हणून मी आपला जपून वापर सुरु ठेवला. 

मजल दरमजल करत अखेरीस सगळे डोंगर संपले. ट्रेक संपता संपता अजून एका साळींदराने आम्हाला दर्शन दिलं. अखेरीस संतुदानी सांगितलं बास आता उतरलं की लगेच झोपडी. परत एकदा सगळ्यांना कडकडून भुका लागल्या होत्या.झोपडीवर जाऊन परत एकदा सगळ्यांनी पोटात चार घास ढकलले आणि निद्रादेवीची आराधना करायला सुरुवात केली.

सकाळी सहाला सगळ्यांचे गजर वाजले. कसेबसे सगळे जण जागे झाले. खरं दिव्य इथून पुढे होतं. वरून खाली डोणज्यापर्यंत जायला आम्हाला गाडी मिळेना. जो थांबे तो अवाजवी पैसे मागे. मग पुन्हा मी, संतुदा आणि प्रदीप वन-टू वन-टू करत डोणज्याच्या दिशेने चालायला लागलो. रात्रभर डोंगर चढायला आणि उतरायला जेवढा त्रास झाला नव्हता त्याहून कित्येक पट अधिक त्रास डांबरी रस्त्याच्या उतारावरून होत होता. कसेबसे आम्ही डोणज्यात पोहोचलो. किल्लेदारीचे अतुल पानसरे त्यांच्या हिमाचल सायकल टूरची प्रॅक्टिस म्हणून आणि आम्हाला भेटायला म्हणून सुद्धा सायकलवर सिंहगडावर आले होते. आमच्या रात्रभराच्या कष्टाची पावती म्हणून अतुलजींनी आमचा नाष्टा स्पॉन्सर केला. डोणज्यातून बस घेऊन अखेरीस साडेनऊच्या सुमारास सिंहगड रोडला आम्ही परतलो आणि ट्रेकची ऑफिशियली सांगता झाली. 

मी स्वतःच स्वतःला मनातल्या "शाब्बास रे मेरे शेर" अशी दाद दिली. ट्रेक पूर्ण करू शकेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं.पण बरोबर असलेली माणसं, मनात असलेली इच्छा यांच्या जोरावर ते करू शकलो. इतकी वर्षे जे लोकांकडून फक्त ऐकलं होतं तो कात्रज ते सिंहगड ट्रेक मी पूर्ण केला होता. सध्या तरी आयुष्यातल्या काही निवडक यशामध्ये या ट्रेकचा समावेश करायला हरकत नाही. 

Wednesday, March 22, 2017

रॉंग नंबर


तो लँडलाईन फोनचा जमाना होता. त्यावेळेस प्रत्येकाकडे कोणता ना कोणता रॉंग नंबरवाला फोन येत असे. माझ्या एका मित्राकडे जुन्नरमधल्या एका हॉटेलचे फोन येत असत. तो सुद्धा खुशाल जेवणाच्या ऑर्डर्स घेत असे. आमच्याही फोनवर असा एक रॉंग नंबर येत असे. बर तो साधासुधा नाही तर जुन्नर पोलीस स्टेशनचा असे. त्याला कारणही तसंच होतं. जुन्नर पोलीस स्टेशनचा नंबर २२०३३ तर आमचा २३०३३ होता. त्यामुळे नंबर डायल करायला थोडी चूक झाली की इकडचा फोन तिकडे जात असे. अशा या रॉंग नंबरवाल्या कॉल्सने करमणूक देखील होत असे. 

एक दिवस रात्री फोन वाजला. दादांनी फोन घेतला आणि पलीकडून आवाज आला, 

"हॅलो जुन्नर पोलीस स्टेशन का?"

दादांनी उत्तर दिले,  "नाही गुंड बोलतोय."

पलीकडचा माणूस बहुधा बावचळला असावा. त्याने पुन्हा विचारले. 

"जुन्नर पोलीस स्टेशनला लागला ना फोन?"

दादा म्हणाले, "नाही गुंडांना लागला."

काही कळेनासं होऊन तो पुन्हा म्हणाला,

"ओ साहेब का चेष्टा करताय."

इकडून दादा परत, "अहो खरंच गुंड बोलतोय."

त्या माणसाला काही कळेना. त्याने फोन कट केला आणि दोन मिनिटांनी पुन्हा केला. परत दादांनीच फोन उचलला. 

"हॅलो जुन्नर पोलीस स्टेशन का?"

"नाही हो. मी गुंड बोलतोय. खराखुरा गुंड."

"ओ साहेब, बास की आता. किती टिंगल करणार माणसाची."

इकडून दादा हसत, "मी टिंगल नाही करत. मी गुंडच बोलतोय. फक्त तुम्ही नंबर चुकीचा लावलाय. तुम्हाला २२०३३ लावायचा आहे आणि तुम्ही २३०३३ लावलाय. २२०३३ ला पोलीस आहेत आणि २३०३३ ला गुंड आहेत. आता सांगा कोणाशी बोलायचंय तुम्हाला."

"आयला असं झालंय काय. मी म्हणलं साहेब का अशी टिंगल करतात आज."

एवढं बोलून त्याने फोन ठेवला. आमची मात्र हसून हसून पुरेवाट झाली. 

Friday, March 17, 2017

बुवा आणि अभ्यास

मी दहावीत होतो तेव्हाची गोष्ट. त्यावेळी पहाटे लवकर उठून अभ्यास करायचो मी. दहावीचं वर्ष असल्यानं हे रोजच चालायचं. पहाटेच्या शांततेत अभ्यासात इतर काही व्यत्यय येत नसे. असाच एक दिवस अभ्यास करत बसलो होतो. साधारण चारच्या सुमारास अचानक कोणीतरी माईकवर बोलत असल्याचं जाणवलं. 

"मंडळी, चार वाजले, उठा."

एवढं होऊन शांतता. थोड्या वेळात पुन्हा तोच आवाज,

"मंडळी, चला लवकर उठा. बरोबर ५ वाजता आपण काकडा सुरु करणार आहोत."

थोडा वेळ गेला आणि पुन्हा तेच. हा माणूस पहाटे उठून माईक हातात धरून त्याच्या सहकाऱ्यांना उठवत होता. माझ्या लक्षात आलं की कुठल्यातरी मंदिरात किंवा आश्रमात हा काकड आरतीचा कार्यक्रम होता. त्यानिमित्त भजन किर्तन वगैरे कार्यक्रम या लोकांनी आयोजित केले होते आणि त्याच घोळक्यातल्या एका स्थानिक पुढाऱ्याला माईक हातात आल्यावर चेव चढला होता. इतका की वेळेचं भान न ठेवता तो खुशाल इतक्या पहाटे माईकवर बोलत होता. 

एव्हाना माझं अभ्यासातलं लक्ष उडालं होतं. दादांना सांगितलं तर ते म्हणाले होईल बंद थोड्या वेळात. मी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली तोवर ह्याच्या अजून दोन तीन आरोळ्या देऊन झाल्या होत्या. मग ५ वाजता आरती सुरु झाली. ती सुद्धा माईकवर. मी आपलं दुर्लक्ष करत अभ्यास सुरु ठेवला. 

दुसऱ्या दिवशी परत पहिले पाढे पंचावन्न. भल्या पहाटे कालचाच माणूस पुन्हा माईक हातात घेऊन लोकांना झोपेतून उठवू लागला. हे असं रोजच चालू राहिलं तर आपल्या अभ्यासाची वाट लागेल हे माझ्या एव्हाना ध्यानात आलं. परत दादांकडे मोर्चा वळवला. त्यांनी पुन्हा मला तेच सांगितलं. 

तिसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार. मग मात्र मी दादांना म्हटलं, 

"या माणसाला काहीतरी करा."

दादांनीसुद्धा विचार केला असेल, 

"हे रोजच चालू राहिलं तर मोठा त्रास आहेच."

त्यावेळेस मोबाईल नव्हतेच. दादा उठून फोनकडे गेले. टेलिफोन डिरेक्टरी उघडून त्या मंदिराचा/ आश्रमाचा नंबर शोधला. फोन लावला. पलिकडून कोणीतरी फोन उचलला. 

"हॅलो, कोण बोलतंय?"

"मी जुन्नर पोलिस स्टेशनमधून बोलतोय. कोण बुवा आहे तिथं ओरडतोय? त्याला गप्प बसव. लोकांच्या तक्रारी आल्यात. च्यायला आमच्याबी झोपा उडवल्यात तुम्ही. ते स्पीकर बंद झालं पाहिजे लगेच." दादाच हिय्या करून फोनवर हे बोलले आणि फोन ठेवून दिला. 

फोन ठेवल्यावर फारतर ३ मिनिटं गेली असतील आणि स्पीकर बंद झाला. आणि बंद झाला तो कायमचाच. माझ्या अभ्यासात येणारा व्यत्यय दादांनी असा सोडवला. 


सांगायचं मुद्दा काय तर तुमच्या भक्तीला आमचा विरोध नाही. पण भावभक्तीच्या नावाखाली कल्ला करू नका. मग ते मंदिर असो की अजून काही, शांततेत देवही सापडतो आणि आमच्यासारख्या पोरांचा अभ्यासही होतो. 

Wednesday, March 15, 2017

एका कवितेची गोष्ट

फार वर्षांपूर्वी आंबेगाव तालुक्यातल्या एका छोट्याश्या खेड्यामध्ये एक शेतकरी राहत होता. त्याला एक मुलगा आणि तीन मुली. आई लहानपणीच निवर्तलेली. मुलींनी शाळेत जाण्याचे दिवस नव्हते ते. मुलगा मात्र शाळेत जात असे. शाळा गावापासून अडीच तीन किलोमीटर असे. गाडीचा पत्ता नव्हताच. मग दोन पायांच्या गाडीनेच गडी शाळेला जात असे. रस्ता म्हणजे खटारगाडीचा रस्ता असे. जाताना येताना सोबत कोणी नसे. रोज एकटाच. इतकं अंतर एकट्याने जायचं म्हणजे कंटाळा येणारच ना. तेव्हा आत्तासारखे मोबाईल नव्हते की लावले हेडफोन्स आणि गाणी ऐकत गेलाय. खेड्यात राहात असल्याने आहेत ती गाणी माहीत असण्याचा काही संबंधच नव्हता. 

एकट्याने चालताना येणाऱ्या कंटाळ्यावर औषध म्हणून तो मुलगा कविता म्हणू लागला. घर सोडलं की दप्तरातून (दप्तर कसलं साधी पिशवीच असायची) पुस्तक काढायचं आणि मोठ्या आवाजात कविता म्हणायला सुरुवात करायची. रस्त्याने जाणारं येणारं माणूस दिसणं त्यावेळी मुश्कीलच होतं. हा एकटाच मोठमोठ्याने कविता म्हणत जायचा. सूर बेसूर याचा विचार त्याच्या मनाला कधी शिवलाच नाही. पण त्याच्या नकळतपणे ह्या कविता म्हणण्याचा त्याला फायदा झाला. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा सगळ्या विषयांच्या कविता तोंडपाठ झाल्या. गुरुजींनी शिकवल्याने आणि  रोजच म्हटल्यामुळे प्रत्येक कवितेचा भावार्थ त्याला चांगला कळू लागला. 

अशात परीक्षा आली. गद्यावरचे प्रश्न तर त्याने सोडवलेच पण पद्यावरचे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे सोडवता आले. मुळात तो हुशार होताच पण आता एकदम पहिला नंबर आला. त्याला काय आनंद झाला सांगू. पण हा आनंद सुद्धा त्याने एकट्यानेच साजरा केला. 

बऱ्याच वर्षानंतर त्याने मग आपल्या या अनुभवावर कविता केली. ती सहज माझ्या हाती लागली म्हणून तुमच्यासमोर ठेवतो आहे.


सावली उंबरी निघाली,
तशी शाळेची वेळ झाली 
काखे मारुनि बुकांची थैली,
स्वारी निघाली शाळेला 

मार्गी बहुतची काटे कुटे,
जोडीला गोटे अन सराटे 
पायताण असणे तेही खोटे,
सोबतीला नसे कुणी 

थैलीतून काढे एक बुक,
आननी  पसरे अमाप सुख
कविता म्हणाया 'हाच' एक,
आवाज तो उंचावूनी 

खड्या स्वरी कविता गाता,
हाच 'गाता' हाच 'श्रोता'
शरम कासया दुजा श्रोता,
दूर अंतरी नसे पै 

आली आली, शाळा आली, 
कविताही कधीच संपली
अहो ती 'पाठच' की झाली!!
अभ्यास न करिताची 

एकदाची परीक्षा होतसे,
सर्वच सवाल सोपे कैसे
फक्त उतरवणे उरले साचे,
बाकी काही नसेची

'हा घ्या' आला पहिला नंबर,
वर्गात झाला बहू गजर 
गळा दाटला अनिवार,
जागीच जिरविला तयाने

कौतुक कुणा नसे साचे,
हेचि वळण पडिले त्याचे 
समजावी आपुल्या मनाते,
उसासूनी पुन्हा पुन्हा 

- जी. बी. 

या गोष्टीतला मुलगा म्हणजे माझे दादा आणि त्यांची ही कविता. 









Sunday, March 12, 2017

जुन्नरची होळी

आज होळीचं नियोजन करायला म्हणून आमच्या सोसायटीमध्ये सकाळपासून लगबग सुरु होती. सोसायटीचा सभासद या नात्याने मीही गेलोच होतो. तेव्हा मग सगळ्यांनी आपापल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

"आदित्य आज संध्याकाळी होळीला येणार ना?" 

घराशेजारच्या विष्णूच्या मंदिरातला संतोष विचारत असे. जुन्नरला असताना दरवर्षी विष्णूच्या मंदिरात अण्णा होळी पेटवत असत. त्या होळीला नैवेद्य दाखवायला आई मलाच पाठवत असे. तिथे मग बोऱ्हाड्यांचा भाऊ, क्षीरसागरांचे विकी आणि मन्या, मिसाळांचा सागर असे बरेच जण येत असत. अण्णा आणि संतोष संध्याकाळपासून मेहनत करून होळी तयार करत असत. आम्हा सगळ्यांना हे नैवेद्य वगैरे निमित्तमात्र असे. खरी मजा होळीभोवती बोंबा मारत फिरण्यात येई. कितीतरी वेळ आम्ही बोंबा मारत होळीभोवती फिरत असू. शेवटी अण्णा ओरडत आम्हाला, "अरे बास आता. किती आरडाओरडा करताय." अण्णांच्या त्या ओरड्यानंतर आम्ही पळ काढत असू. कधीकधी डहाळ्यांचा लालू आणि रितू त्यांच्या घरासमोरच्या तिठ्यावर होळी करत असत. विष्णू मंदिरातली होळी संपवून आम्ही तिकडे पळत असू. तिथे पुन्हा तोच आरडाओरडा करायला मजा येई. बऱ्याचदा मग होळी संपवून घरी जाण्याऐवजी आमचा तिथेच लपंडाव रंगे. इतक्या रात्री लपंडाव खेळण्यात वेगळीच मजा होती. कोणाची तरी आई किंवा वडील येऊन त्याला हाताला धरून नेईपर्यंत डाव चालत असे. 

परदेशपुऱ्याची होळी हे एक अजब प्रकरण होतं. तिथले लोक पिंपळाजवळ एका सुकलेल्या झाडाचे दांडगे खोड उभे करत. ती होळी पहायला वेगळीच मजा असे. पुढचे एक दोन दिवस ते खोड तसेच जळत राही. 

होळीनंतर मग वेध लागत ते रंगपंचमीचे. जुन्नरला धूलिवंदनाला रंग फारसं कोणी खेळत नसे. शाळांनाही रंगपंचमीची सुट्टी असे. त्या दिवशी मग सकाळीच लवकर उठून मी दिवसभराचा अभ्यास उरकून घेत असे. साधारण ११ च्या आसपास बाहेर पोरांचा आवाज यायला लागला की आईने आधीच काढून ठेवलेले जुने कपडे घालून बाहेर पडत असे. कोणाकडे कोणता रंग आहे, कोणता रंग चांगला आहे अशा चौकश्या करून रंग विकत घ्यायला मी सुभाष जनरल स्टोअरकडे जात असे. त्यानंतर अगदी संध्याकाळपर्यंत आम्ही रंग खेळत असू.  डहाळ्यांचा लालू घरासमोर पाण्याचं एक पिंपच भरून ठेवत असे. एकमेकांना रंग लावून आम्ही त्या पिंपाभोवती घोळका करून मस्ती करत असू. ते करत असताना कोणी जाताना येताना दिसला की त्याला धरून रंग लावायचा आणि त्या पिंपात बुचकळून काढायचं हे असले उद्योग आम्ही करत असू. चुकून एखाद्याने हुलकावणी दिलीच तर त्याच्यावर पाण्याच्या फुग्यांचा मारा होत असे. आमच्यातले काहीजण रंग खेळायला येत नसत. ते चुकून आम्हाला कुठे दिसले तर त्यांची मात्र धडगत नसे. काहीजणांना तर आम्ही त्यांच्या घरात जाऊन रंग लावत असू. जसं वय वाढत गेलं तसं रंग खेळण्याचं प्रमाण कमी होत गेलं. पण तरी एखाद दोन तास तर नक्कीच जात असत.

रंग खेळून घरी आलं की आईच्या शिव्या खात आंघोळ करावी लागे. इतका वेळ गार पाण्यात खेळून आल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करायला काय सुख असे. बऱ्याचदा तर ही सफाई झाल्यानंतर सुद्धा एखादा मित्र रंग लावायला घरी येई. मग मी आत्ताच आंघोळ केली आहे असं सांगून थोडक्यात सुटका करून घेतली जाई. 

दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर कोण किती खेळलं, कोणी किती फुगे फोडले, कोणाला फुगा लागून दुखापत झाली, कोणाचा रंग अजूनही हाताला आहे अशा चर्चा पुढचे दोन दिवस चालत असत. काही शिक्षक रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सगळ्यांना पुढे बोलावून हाताला, पायाला, मानेला, कानाला कुठे रंग आहे का हे तपासून पाहत. जो कोणी सापडेल त्याला छड्या खाव्या लागत. या शिक्षक लोकांना रंग खेळायला मिळत नाही म्हणून त्याचा राग ते आपल्यावर काढतात की काय अशी शंका आमच्या बालमनात तेव्हा येई. 

पुण्यात गेल्यावरसुद्धा एखाद्या वर्षी रंग खेळल्याचे मला आठवते. रंग खेळून वैशालीमध्ये डोसे खाल्ले होते आम्ही. अमेरिकेत गेल्यानंतर इंडियन स्टुडंट असोशिएशनने आयोजित होळीच्या कार्यक्रमाला मी जात असे. पण रंग मात्र खेळल्याचे आठवत नाही.

आज होळी तर साजरी करतोय पण रंगपंचमीला रंग खेळावेत की नाही हा गोंधळ अजूनही मनात आहेच.